डोंबिवलीत राहणाऱ्या आणि डोंबिवलीतच वैद्यकीय सेवेत राहून रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर सरोदे यांनी एका अभिनव पद्धतीचा अवलंब करून आपल्या आईच्या वर्षश्राद्ध सोहळा साजरा केला. या आगळ्यावेगळ्या वर्ष श्राद्धाची चर्चा सर्वत्र होत आहे.
डॉक्टर योगेश सरोदे, डोंबिवली शहरातील नांदिवली भागात गेली अनेक वर्ष रुग्णसेवा करत आहेत त्यांच्या मातोश्री सरोदे यांचे गेल्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले यावर्षी मे महिन्यात आपल्या आईचं शशिकला सरोदे ह्यांचा वर्षश्राद्ध करण्याचा सरोदे सरांचा मानस होता. इंडियन मेडिकल असोसिएशन च्या माध्यमातून एप्रिल महिन्यात एका मोफत रुग्ण तपासणी शिबिराला डॉक्टर योगेश सरोदे शहापूर जिल्ह्यातील खरली या गावानजीक गेले होते. तेथील रुग्णांची पाहणी करत असताना त्यांच्या लक्षात आले की यापैकी अनेक रुग्ण कुपोषित ,कमजोर आहेत त्यांची वजन खूप कमी आहेत. आणि मग डॉक्टर सरोदे यांनी एक निर्णय घेतला अभिनव पद्धतीने आपल्या मातोश्रींचे वर्षश्राद्ध साजरे करायचा.
दिनांक 21 मे रोजी खरली या शहापूर मधील दुर्गम आदिवासी पाड्यावर डॉक्टर आपल्या परिवारासह पोहोचले आणि तेथे जाऊन आपले सर्व कुटुंबीय वडील लीलाधर सरोदे, पत्नी डॉ वर्षा सरोदे , भाऊ संदीप सरोदे यांच्या मदतीने एकूण 54 कुटुंबांना महिनाभर पुरे एवढा किराणामाल त्यांनी मोफत वाटला.
या वाणसामानामध्ये रवा ,पोहे, साखर, तेल ,तूप ,शेंगदाणे, साबुदाणे ,गव्हाचे पीठ, गूळ, खजूर, बिस्किटे इ. अशा सर्व आरोग्यदायी पदार्थांचा समावेश होता. ज्या कुटुंबांना फक्त तांदूळ डाळ आणि सरकारी मिळणाऱ्या मदतीवर आपल्या महिन्याची गुजरात करावी लागते त्या कुटुंबांना हा पोषक आहार मिळाल्यावर त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता.
ह्या आदिवासी भागात काम करणाऱ्या हेल्पिंग हँड वेल्फेअर सोसायटी या संस्थेने ह्या कार्यक्रमाचे नियोजन केले.